मोबाईल मला नको आई, मला मोठ्ठं व्हायचंय... | ARJ Sir, Daund

प्रिय आई-बाबा,

सप्रेम नमस्कार!

आई, आज मला तुला आणि बाबांना एक गोष्ट मनापासून सांगायची आहे...

“मोबाईल मला नको आई, मला मोठ्ठं व्हायचंय...”

हो आई, मला मोबाईल नकोय.
मला त्यात सतत गुंतून राहायचं नाही. कारण मला भीती वाटते की, हळूहळू त्यात इतका गुंतून जाईन की माझं डोकं चालणं थांबेल, विचार करण्याची सवय कमी होईल आणि माझ्या स्वप्नांची वाटच हरवून जाईल.

आई, मला मोठं व्हायचंय...
फक्त उंचीने नाही, तर विचारांनी मोठं व्हायचंय.
ज्ञानाने मोठं व्हायचंय.
चांगला माणूस म्हणून मोठं व्हायचंय.

मला मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये माझं मोठं जग बंदिस्त करायचं नाही.
मला पुस्तकांच्या पानांतून जग पाहायचंय.
मला मैदानावर धावायचंय, खेळायचंय, पडायचंय आणि पुन्हा उठायचंय.
मला मित्रांसोबत मनमोकळं हसायचंय.
मला आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत.
मला तुमच्यासोबत बसून गप्पा मारायच्या आहेत.

आई-बाबा,
तुम्ही माझ्या हातात मोबाईल देऊन मला शांत करू शकता;
पण माझ्या मनाला आनंद देण्यासाठी तुमचा वेळ आणि तुमचं प्रेमच मला हवं आहे.

कधी कधी मला मोबाईल द्यावासा वाटेल,
कधी मी हट्टही करेन.
पण त्या वेळी मला माझा हट्ट पूर्ण करून देण्यापेक्षा माझं भविष्य घडवण्यासाठी मला थोडं थांबवणं.

माझ्यावर रागावू नका...
मला ओरडू नका...
फक्त माझ्याशी बोला.

माझ्या हातात मोबाईल देण्याऐवजी एखादं पुस्तक द्या.
गेम खेळण्यासाठी मोबाईल देण्याऐवजी माझ्यासोबत मैदानात या.
व्हिडिओ दाखवण्याऐवजी तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी मला सांगा.

कारण मला तुमच्याकडून मोबाईलपेक्षा मौल्यवान अशी दिशा हवी आहे.

मला भविष्यात असं म्हणायचं नाही की,
“माझं बालपण मोबाईलच्या स्क्रीनवर गेलं...”

मला अभिमानाने म्हणायचंय,
“माझ्या आई-बाबांनी मला मोबाईलच्या आहारी जाऊ दिलं नाही; त्यांनी मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेलं!”

आई-बाबा,
माझ्या हातात मोबाईल कमी आणि
पुस्तक जास्त द्या...

माझ्या डोळ्यांसमोर स्क्रीन कमी आणि
स्वप्नं जास्त ठेवा...

माझ्या वेळेत गेम कमी आणि
खेळ जास्त असू द्या...

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
माझ्या आयुष्यात मोबाईलपेक्षा
तुमचा सहवास जास्त असू द्या.

कारण...

मला मोबाईलमध्ये हरवायचं नाही,
मला आयुष्यात जिंकायचंय!

मोबाईल मला नको आई,
मला मोठ्ठं व्हायचंय...!

तुमचा लाडका/लाडकी,
तुमचा मुलगा / तुमची मुलगी

लेखक : श्री. अभिषेक राजेश जाधव
(ए आर जे सर, दौंड)

Comments

Popular posts from this blog

सतत माहितीच्या पूरात हरवणारी पिढी – पालकांनी समजून घेतलेच पाहिजे!

मरजाणी नाही, कौशल्यांनी विकास व्हावा