हरवलेली मने | पालक म्हणून आपण किती योग्य मार्गावर?
"आधुनिक काळातील पालकत्व: केवळ कमावणं पुरेसं नाही!"
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आई-वडील दोघंही नोकरी करत असतात. आर्थिक स्थैर्य मिळवणं गरजेचं झालं आहेच. पण हाच कल पालकत्वाच्या मूळ उद्देशापासून आपल्याला दूर नेतोय.
पूर्वीचा काळ वेगळा होता – एकजण घर सांभाळायचा, एकजण बाहेर जाऊन काम करायचा. संवाद, वेळ, प्रेम, शिक्षण या गोष्टी घरातच मिळायच्या. पण आता, दोघंही कामात गुंतले आहेत, आणि लहान मुलं – शाळा आणि क्लासमध्ये. अशा परिस्थितीत पालक आणि मुलं यांच्यातील संवाद कमी झालाय.
पालक केवळ पैसे कमावतात, आणि त्या पैशातून मुलांचं शिक्षण, सुविधा, शाळा-क्लास यांची जबाबदारी पार पाडतात. पण पालकत्व केवळ आर्थिक जबाबदारी नाही.
आजची खरी अडचण काय आहे?
- संवादाचा अभाव
- वेळेचा अभाव
- "शिकवतोय" असं वाटत असलं तरी "जोडणं" हरवत चाललंय
- मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंकांचं निरसन करणारा कोणीच नाही
- इंटरनेट, सोशल मीडियाचा भडिमार, पण मूल्यांची घसरण
यातूनच अल्पमती, निर्णयक्षमतेचा अभाव, आणि नैतिकतेचं दुर्लक्षित होणं सुरू झालंय. आज मुले अधिक चिडचिडी, असमाधानी आणि तणावाखाली का आहेत? कारण त्यांना ऐकणारं, समजून घेणारं, वेळ देणारं कोणीच नाही.
मग उपाय काय?
- दररोज थोडा वेळ मुलांसोबत घालवा – नुसतं विचारपूस नाही, तर त्यांचं ऐका.
- त्यांना केवळ शिकवू नका, समजून घ्या.
- तुमचं स्वतःचं वर्तन, भाषा, संयम हेच त्यांचं मूळ शिक्षण आहे.
- डिजिटल उपकरणांपेक्षा जिवंत संवाद महत्वाचा आहे.
- "व्यस्त" राहणं समजतं, पण "उपस्थित" राहणं हेच खरं पालकत्व आहे.
शेवटी एक विचार…
मुलांचं भलं केवळ चांगल्या शाळा-क्लासनी होत नाही, ते घडतात – संवादातून, स्नेहातून, मार्गदर्शनातून.
पैसे हे साधन आहे – पण पालकत्व ही जबाबदारी आहे – आणि ती निभावण्यासाठी "ज्ञान", "समज" आणि "वेळ" या तीन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
आपण अपयशी पालक ठरू नये, म्हणून आजपासूनच एक पाऊल पुढे टाका.
लेखक: डॉ. श्री. अभिषेक राजेश जाधव (ARJ Sir, Daund)
Comments
Post a Comment